Wednesday, July 21, 2010

‘मराठी’

हा शब्द उच्चारताच आपल्या दृष्टीपुढे कितीबरी गोष्टी उभ्या राहतात!
महाराष्ट्र भूमी, मराठी माणसं, मराठी माणसाची मराठी मन,
मराठी माणसाची संस्कृती, संत कवी, लेखक, नाटककार, अभिनेते, क्रिकेटपटू, चित्रकार,
कुस्तीवीर, मराठी मातेच्या कीर्तीमान सुकन्या.
पण आज आपण केवळ ‘मराठी’ भाषेचाच-ओजस्वी भाषेचा विचार केलातरी अभ्यास संशोधनानंतर कळतं की,
अनेक विचारवंतांनी आपल्याला मराठी भाषेला आपल्या मनातील विचारसौंदर्य बहाल केलं आहे.
आद्य कवी मुकुंदराज, आद्य नाटककार विष्णुदास भावे, आद्य कांदबरीकार बाबा पद्मनजी,
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत अशी नुसती
‘आद्याची’ नामावली सुद्धा दहा पृष्ठांची होऊ शकेल.
 
एक गोष्ट मात्र खरी मराठी माणसाने मराठी भाषेवर नितांत अकृत्रिम प्रेम करावे. 
सानेगुरुजी म्हणतात की, संत ज्ञानेश्वरांनी ‘स्त्री शुद्ध प्रतिभेत सामावले ’ 
असा विचार ज्ञानेश्वरीत प्रगट करुन मराठी माणसाचा मोठेपणाच सिद्ध केला आहे. 
या मराठी माणसाला ‘ज्ञानाच्या भाकरी सोबत विचारांचा ठेवाही लागतो’ असंही साने गुरुजी पुढे म्हणतात.
मराठीतला सर्व श्रेष्ठ विचार कोणता? तर डॉ. अरुण टिकेकर म्हणतात, 
‘संत ज्ञानेश्वरांची अजरामर रचना म्हणजे ‘पसाय-दान’ हा मराठीचा बहुमोल ठेवा आहे.
तो जतन करायलाच हवा.’ ते म्हणतात, 
‘सर्व जगात बिनतोड असा हा विचार आहे. पसायनदाना सारखा विचार 
जागतिक वाड्‍ःमयात क्वचित कोठे आढळेल, 
पसायनदानातील विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेला जगात कोठे ही तोड नसेल!’ 
साने गुरुजींनी तरी ‘समस्ता बंधू मानावे कारण प्रभुची लेकरे सारी’ 
असंच नाही का म्हटल? पण या समस्तामध्ये जनी जनार्दन शोधण्याची प्रक्रियाही अंतर्भूत होते असं 
छत्रपती शाहू महाराजाचं म्हणणं आहे ‘मराठीचा धर्म कोणता?
देशबंधूंची सेवा करणे,
जनी जनार्दन शोधणे,
आणि जनी जनार्दन पाहणे!‘

गोपाळ गणेश आगरकर तरी दुसरं काय म्हणतात? त्यांच्या मते 
रामदासांनी आपल्याला दिलेली शिकवण ‘शहाणे करुन सोडावे सकळजन’ ही अत्यंत महत्वाची आहे. 
‘देश समर्थ, शक्तिशाली व्हावा म्हणून, लोकांची मने कार्य प्रवण व्हावीत म्हणून सर्वांनी स्वीकारावे एकमेव ब्रीद 
‘शहाणे करुन सोडावे सकळ जन! केवळ ज्ञानेश्वर, रामदासांनीच नव्हे तर 
सगळ्याच मराठी संतांनी असाच संदेश दिला आहे. 
जीवनरहस्यकार विमलाताई ठकार म्हणतात - ‘संतांनी महत्त्व सांगितले,
निर्हेतुकाची कला शिकविली, निरागस अवधानाची, समर्पण वृत्ती, कोमलता, 
सहजता, शालीनता अंगी बाळ्गून शिकवण दिली माणुसकीची!
पण आम्ही काय करतो? संत काव्य फक्त वाचतो.
त्यांची शिकवण स्वतःच्या अंगी बाणवायची आहे हे विसरतो?"
अशी तक्रार आहे - ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांची - ‘संत साहित्य नुसते वाचू नका. 
ते प्रत्यक्ष कृतीत आणा, संतांची आज्ञा पाळणे हाच असावा मराठी माणसाचा बाणा!’
 
त्यांनी ‘मनाचे श्लोक’ हे रामदासास्वामींच्या अजोड साहित्यानिर्मितीच प्रतीक आहे असं म्हटलं आहे.
 
‘मनाचा प्रत्येक श्लोक
प्रमार्थाने भरलेला आहे,
रामदासांनी तो लिहून
आम्हाला उपकृत केलेल आहे?
तर लोकमान्य टिळ्कांन ‘ग्रंथ हेच गुरु’ वाटत. ते म्हणत, 
‘मी चांगल्या ग्रंथांच्या घेरावात असेन तर त्यापुढे स्वर्गप्राप्ती सुद्धा तुच्छ आहे.
मी चांगल्या ग्रंथांच्या घेरावात असेन तर स्वर्गाचे सुख चालून आले तरी नाकारीन, 
कारण चांगले ग्रंथ ज्या जागी असतात - तेथे ते प्रत्यक्ष स्वर्गच निर्माण करतात!’
टिळकांच्या मनात मायमराठी बद्दल नितांत श्रद्धा. मराठी जनता म्हणजे कल्पवृक्ष प्रत्यक्ष कामधेनूच! 
"मला राष्ट्रजागृतीसाठी पैसा’ लागला, निकड जनतेला कळली आणि ‘तो’ मायमराठीने दिला नाही, 
माझी झोळी भरली नाही असे कधी झाले नाही. 
मराठी जनता कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे. मला कधीच कमी पडू दिलं नाही."
 
मराठी लेखकांनी ‘मराठी माणूस’ हा आपल्या लेखनाचा केंद्रबिंदू मानून लिखाण करावं असं 
वि.स. खांडेकर म्हणतात. ‘माणूस हा साहित्याचा केंद्र बिंदू असावा, 
मानवता हीच मराठी लेखकाची जात आहे. जीवनात जे जे चांगले होते ते ते त्याने स्वीकारावे. 
मी केवळ जीवनवादी नसून संस्कारवादी आहे!
मराठी लेखकानंकेवल कलात्मक, जीवनवादी लिहून भागत नाही तर त्यांने संस्कारवादीही असावं आणि मी तसाच आहे!’ 
असं विधान भाऊसाहेबांनी केलं आहे.
 
संत गाडगेबाबा स्वतः निरक्षर होते पण प्रत्येक ‘मुलांनं शिकलं पाहिजे’ हा त्यांचा आग्रह
दरवेळी ते आपल्या रसाळ कीर्तनातून करीत.
‘माणसाणे एक सांजचे उपाशी रहावे, बाईने लुगडे फाडून त्याचे दान करावे,
पण आपल्या पोराले अज्ञानी ठेवू नये, त्याने मराठी शाळेमंदी शिकाले पाठवावं!‘ 
आपल्या मातृभाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान असावा आपली मातृभाषा म्हणजे मराठी ती तर आपली आईच. 
साने गुरुजी म्हणतात - ‘आपल्या मातृभाषेबद्दल मराठी माणसाला अभिमान नाही, पाऊणपट मुले महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात, देश महाभयंकर संकट काळात त्यामुळे सापडला आहे. 
दारिद्र्याच्या खाईत आपले लोक गटांगळ्या खात आहेत!’
 
आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मराठी आपली आई, धर्म आपली माता. 
आपण खरे मातृपूजक आहोत. दुसऱ्याच्या मातेची निंदा करणारे नव्हेत.’ 
आपली मराठी भाषा किती ओजस्वी, प्रसादपूर्ण , सहजबोध आहे हे यशवंतराव चव्हाण असं समाजातून सांगतात,
‘मराठीत भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची जुळणी पहा कशी आपोआप सहज होऊ लागते. तुम्ही आपल्या भाषेवर अपार प्रेम करावं, नाहीतर तुमची ऐनवेळी वोलताना फजिती होईन!
 
दुर्गाबाई भागवत म्हणतात, कोणत्याही गोष्टीत मग, 
ती मराठी भाषा का असेना, प्रभुत्त्व मिळवायचं असेल तर ‘वाया जाऊ नेदी क्षण’ 
हा विचार मोलाचा आहे. मंगेश पाडगावकर म्हणतात ‘आमचा कवी कोणत्याही ‘वर्गाचा’ नसतो. 
तो फक्त माणसाचे गाणे गात अस्तो! मुलाना वाचनाची गोडी आज अजिबात राहिलेलेई नाही 
अशी खंत प्रकाशभाई मोहाडीकर, साने गुरुजी कथामालेतून व्यक्त करतात. 
‘बालवाड्‍ःमयाच्या प्रसारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी.
मुलांना मराठी शिकवून वाचनाची गोडी त्यांना लावावी.’ 
यदुनाथ थत्ते म्हणतात, ‘बालकुमार युवकांच्या वाचनाला फार महत्त्व आहे’
तर मधु दंडवते म्हणतात, ‘सानेगुरुजींच्या साहित्याला मराठीत फार मान आहे. 
काही पुस्तकांचे इंग्रजी अनुवादही झाले आहेत. पण मुळ मराठीत असलेल्या पुस्तकांचा अनुवाद आपण एकदा वाचून तरी पहावा असं इंग्रजी वाचकाला वाटतच नाही! विष्णुशास्त्री चिपळूणकर लेखकाच्या स्फूर्तीबद्दल म्हणतात, 
‘अंतःकरणाला पीळ पाडणारे घडले म्हणजे लेखणीने लिहायला सुरुवात केलीच पाहिजे!’
 
ही मराठी माणसाच अंतरंग व्यक्त करणारी मोलाची गोष्ट आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षिका झाल्यानंतर आपल्या महिला विद्यार्थिनीला एकच मोलाच संदेश दिला. ‘भागिनीनो, तुम्ही एकदा का, मराठी लिहायला वाचायला शिकलात तर भाविष्यकाळातलं यश पडेल नक्कीच तुमच्या पदरात!’
 
आचार्य विनोबांनी देवनागरीचा लिपी म्हणून केवळ मराठीसाठीच नव्हे तर सर्व भारतीय भाषांकरिता उपयोग करावा असा आग्रह धरला आहे. भाषाकोषकार विश्वनाथ नरवणे यांचंही म्हणणं हेच आहे. विनोबा म्हणतात, ‘मराठीच्या लेखकांनी इतर भाषेतील बोधप्रद साहित्य अनुवादित करुन मराठी वाचकांना द्यावे. मराठीचे अवांतर वाचन मुलांनी केल नाही तर त्यांना पुढे फार पश्चात्ताप होईल!’ असाही निष्कर्ष ते काढतात. म. गांधी मातृभाषा हीच शिक्षणाचम माध्यम म्हणून वापरली तर आपण स्वदेशीचा अंगिकार केला असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल असे सांगतात .
 
पानिपतकार विश्वास पाटील यांच्या सार्थ उक्तीनं या लेखनाचा समारोप करु या -
 
 

‘मराठीची चिंता करण्याची गरज नाही, ग्रामीण भागात ती जागवली जात आहे, शाहीर आणि संत कवींनी हातभार लावला आहे. सात समुद्र ओलांडून मराठी जाणार आहे!’

No comments:

Post a Comment