Tuesday, February 22, 2011

इतिहास आणि आत्मनिरीक्षण

ज्या सामाजिक, जातीय, धार्मिक आणि महाराष्ट्रीय दुर्गुणांनी मर्‍हाठी माणूस, मयत आंग्रेजी राजवट काय किंवा हयात कांग्रेजी (तथाकथित) लोकवट काय, यांत जिवंत असूनही मेल्यासारखा जगत आहे, त्या दुर्गुणांचा निचरा पाडून, त्याला नवयुगांतला एक नवा कर्तबगार माणूस बनविण्याच्या हिंमतीने क्षितिजावर आलेल्या शिवसेनेचा द्रोह म्हणजे महाराष्ट्राचा द्रोह होय, हें विरोधकांनीं ध्यानांत ठेवावे... प्रबोधनकार ठाकरे यांनी २४ मार्च १९६८च्या साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये व्यक्त केलेले हे विचार...
आम्हा मराठ्यांना आमच्या मराठी इतिहासाचा फार मोठा अभिमान. 

आमच्या सार्‍या मोठेपणाचा दिव्य भव्य खजिना त्यांत सांठविलेला आहे, 
अशी प्रौढी मारण्याची आम्हाला संवयच लागून गेलेली आहे. आम्ही कोण, 
कोठचे, कसें होतो, काय काय पराक्रम केले, इत्यादींच्या इतिहासांतल्या कथा-दंतकथांसह-वाचताना ऐकताना आमची मनोवृत्ती अगदी फुलारून जाते. इतरांपेक्षां आम्हीं कोणीतरी विशेष आहो, या गर्वाचे वारेंहि क्षणभर आणि क्षणभरच - आमच्या मस्तकांत भिरभिरूं लागते. वास्तविक इतिहास म्हणजे तरी काय? माणसांनीं माणसांवर - अगदी आपल्या जिवाभावाच्या - सग्यासोयर्‍यांवर केलेल्या अनंत अत्याचारांचा नि घातपातांचा आरसाच असतो. 
किंचित सत्याची चाड बाळगून, असत्याची चीड जागी ठेवून, 
आपण मराठ्यांचा इतिहास पाहिला; 
आत्मनिरीक्षणासाठीं त्या आरश्यांत आपल्या पूर्वजांच्या भल्याबुर्‍या कर्माचा शोध घेतला; 
तर एक निराळाच देखावा आपल्याला दिसूं लागेल. 
आजवर आम्ही इतिहासांतली साजिरी गोजिरी बाजूच पहात आलों.
लढायांतल्या विजयी वीरांच्या पराक्रमांच्या गाथाच तेवढ्या गात बसलो. 
त्यांतला रक्तपात, मानवहानी, वैराचे भडकलेले इंगळे, बेचिराख झालेली गांवें नि मोठमोठ्या राजधान्यांच्या झालेल्या मसणवट्या यांतल्या अंतर्भूत ‘‘का?’’चा शोध फारसा कधी कोणी घेतलाच नाही. 
विजय झाला का दिवाळी साजरी करावी. पराभव झाला का शिमगा करीत कपाळाला हात लावावा. यापेक्षां विशेष खोलांत आजवर आपण फारसे गेलोंच नाही. ‘‘ज्यांचा भूतकाळ उज्ज्वल, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल’’ हें सुभाषित सुभाषितापुरतें ठीक आहे. पण आमचा भूतकाळ उज्ज्वल, हें ठरवायचे कोणी नि कसें? आमचा स्वभाव, परंपरा, मनोवृत्तीची ठेवण, यांत कालमानानें काही बदल झाला आहे,?

का आम्ही अडीच तीनशें वर्षापूर्वी जसे होतो तसेच आज आहोंत? 
हा प्रश्‍न आत्मसंशोधनानें आत्मनिरीक्षणानें सोडवला पाहिजे. 
मराठी इतिहासाची आजवर एकच बाजू आपण पहात आलों. नाण्याची दुसरी बाजू कधीं उलटलीच नाही. 
आज आमच्या पिण्डप्रकृतींत जे दोष प्रकर्षाने आढळतात, 
त्यांच्या परंपरेचा धागा थेट आमच्या पूर्वजांपर्यंत अखंड लांबलेला आहे. त्यांच्या एकूणच पातकांचा, परस्परांतील हेव्यादाव्यांचा, स्वार्थासाठीं सख्ख्या भावाचाही गळा कापण्याचा, 
सरसाऊन पुढे जात असलेल्यांच्या तंगड्या ओढण्याचा, 
फार काय, पण वैर्‍याचें घर जाळण्यासाठीं 
परकीय शत्रूलाही स्वत:च्या घरांत आणून बसविण्याचा वारसा 
आम्ही मर्‍हाठ्यांनीं आजवर बिनचूक पाळला आहे. जोपासला आहे. कसा? 
तीच त्या नाण्याची दुसरी बाजू आज मुद्याम पुराव्यानिशीं महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर ठेवीत आहे. 
उठसूट एखाद्या फितुराचा संदर्भ दाखवताना आम्ही सूर्याजी पिसाळाचें नांव घेतो. 
आमच्या एककल्ली विचारसरणीनें त्या बिचार्‍याला मात्र हकनाक अजरामर करून ठेवला आहे. 
पण वैयक्तिक, जातीय, धार्मिक आणि व्यावसायिक वर्चस्वासाठीं 
फंदफितुरी, असुया, द्वेष, कारस्थानें, रक्तपात, जाळपोळ आणि हत्या 
यांपासून मराठ्यांच्या इतिहासांतला एक तरीं कालविभाग अलिप्त होता कां? 
याचा विचार आपण फारसा करीत नाही. 
चालू घडीला या दोषांचे दाखले दिसलें आढळले का हे जणूं नव्यानेंच काट्यासराट्यासारखे उगवले आहेत, असे आपण समजतो. पण नाही. 
ती एक अविच्छिन्न परंपरा आहे. शतकानुशतके ती आज आहे तशीच चालत आलेली आहे. कालमान बदलले, सर्व व्यावहारिक क्षेत्रांत विचारक्रांती झाली, आचारक्रांतीला तिनें आव्हान दिले, 
तरी आम्ही मर्‍हाठे आजही त्याच जुन्या परंपरेच्या स्वभावदोषांना चिकटून आहोत. 
कडू लागेल हें लिहिणें कित्येकांना. पण पुरावेच देणार आहे मी आज.
मराठे लढले! पण कोणाशीं?
आम्ही मर्‍हाठे मोठे लढवय्ये. फार मोठमोठ्या लढाया मारल्या आम्ही. पण कोणाशीं? 

मराठ्यांनीं निजाम, हैंदर, मोगल, इंग्रेजांनी जितक्या लढाया दिल्या त्याच्या दसपट त्यांनीं आपापसांत लढवल्या. मराठ्यांच्या आपापसांतील लढायांची संख्या पाहिली का आमच्या लढवय्येपणाचा बकवा केवळ बकवाच म्हणावा लागतो. ही घ्या यादी :-
१ शहाजीराजे भोसले विरुद्ध लुकजी जाधव शिंदखेडकर 

२ छत्रपती शिवाजी विरुद्ध मुधोळचे घोरपडे 
३ छत्रपती शिवाजी विरुद्ध जावळीचे मोरे 
४ छत्रपती शिवाजी विरुद्ध तंजावर व्यंकोजी 
५ छत्रपती संभाजी विरुद्ध कुट्रे येथील शिर्के 
६ छत्रपती संभाजी विरुद्ध चिटणीस घराणे 
७ छत्रपती संभाजी विरुद्ध राजाराम महाराज 
८ छत्रपती शाहू विरुद्ध राणी ताराबाई 
९ संताजी घोरपडे विरुद्ध धनाजी जाधव 
१० छत्रपती शाहू विरुद्ध कोल्हापूरकर छ. संभाजी 
११ बाळाजी विश्‍वनाथ विरुद्ध चंद्रसेन जाधव 
१२ बाजीराव बल्लाळ विरुद्ध त्रिंबकराव दाभाडे 
१३ बाळाजी बाजीराव विरुद्ध रघुजी भोसले 
१४ बाळाजी बाजीराव विरुद्ध बारामतीकर जोशी 
१५ बाळाजी बाजीराव विरुद्ध सासवडचे पुरंदरे 
१६ बाळाजी बाजीराव विरुद्ध दमाजी गायकवाड 
१७ बाळाजी बाजीराव विरुद्ध तुळाजी आंग्रे 
१८ संभाजी आंग्रे विरुद्ध मानाजी आंग्रे 
१९ पिलाजी गायकवाड विरुद्ध कंठाजी कदम बांडे 
२० बाळाजी विश्‍वनाथ विरुद्ध कृष्णराव खटावकर 
२१ राघोबादादा पेशवा विरुद्ध पंत प्रतिनिधी 
२२ राघोबादादा विरुद्ध मुतालिक 
२३ राघोबादादा विरुद्ध गोविंद हरी पटवर्धन 
२४ माधवराव पेशवे विरुद्ध जानोजी नागपूरकर 
२५ साबाजी भोसले विरुद्ध मुधोजी भोसले 
२६ माधवराव बल्लाळ विरुद्ध राघोबा दादा 
२७ बारभाई मंडळ विरुद्ध राघोबा दादा 
२८ राघोबा दादा विरुद्ध हरि बाबाजी 
२९ राघोबा दादा विरुद्ध सर्व
पटवर्धन सरदार 

३० गोविंदराव गायकवाड विरुद्ध सयाजीराव, फत्तेसिंग, मानाजीराव 
३१ बारभाई मंडळ विरुद्ध मोरोबा फडणीस, सखाराम बापू 
३२ तुकोजी होळकर विरुद्ध लखबादादा लाड 
३३ भवानराव प्रतिनिधी विरुद्ध भगवंतराव प्रतिनिधी 
३४ सातारकर छत्रपती विरुद्ध आनंदराव रास्ते, परशुराम भाऊ पटवर्धन 
३५ परशुरामपंत प्रतिनिधी विरुद्ध बापू गोखले 
३६ कोल्हापूरकर छत्रपती विरुद्ध परशुरामभाऊ पटवर्धन 
३७ बापू गोखले विरुद्ध विठोजी होळकर 
३८ दौलतराव शिंदे विरुद्ध यशवंतराव होळकर 
३९ बाळोजी कुंजर विरुद्ध सर्जेराव घाटगे 
४० कोल्हापूरकर छत्रपती विरुद्ध रामचंद्र प. पटवर्धन 
४१ कोल्हापूरकर छत्रपती विरुद्ध इचलकरंजीकर 
४२ बापू गोखले विरुद्ध रामचंद्र प. पटवर्धन 
४३ दौलतराव शिंदे विरुद्ध दत्तक आया 
४४ रामचंद्रपंत पटवर्धन विरुद्ध रत्नाकर राजाज्ञा 
४५ चतुरसिंग भोसले विरुद्ध बाजीराव रघुनाथ 
४६ गंगाधरशास्त्री पटवर्धन विरुद्ध सीताराम रावजी 
४७ आबा शेलूकर विरुद्ध बाबाजी आप्पाजी 
४८ आनंदराव गायकवाड विरुद्ध कान्होजी गायकवाड 
४९ मैनाबाई पवार, धारकर विरुद्ध मुरारीराव पवार 
५० फत्तेसिंग गायकवाड विरुद्ध कडीचे मल्हारराव 
५१ बाळोजी कुंजर विरुद्ध यशवंतराव होळकर 
५२ सिद्धेश्‍वरपंत बिनिवाले विरुद्ध नारोपंत आपटे.
दात दाखवा, पण जात दाखवूं नका
सारी मराठशाही नि पेशवायी आम्ही आपापसांतच झुंजवून आरपार लंजूर करून टाकली, 

म्हणूनच अखेर जहांबाज आंग्रेजांचा इथे शिरकाव झाला. 
त्या काळीं मुत्सद्दी मनुष्याची आमची क्वालिफिकेशन्स कोणती? 
तर फंद फितुर, लांचलुचपत, दगाफटका, खेळखंडोबा, लांडीलबाडी, लूटमार, जाळपोळ यांत जो पटाईत तो मुत्सद्दी, तो वीर, तो पराक्रमी!
आमचा आंग्रेज मोगलादि शत्रूशी दावा डिप्लोमसीच्या हातरुमालाचा. 
पण परस्परांत निमित्त होतांच घातलाच तलवारीला हात.
सध्या तलवारीचा काळ नाही. तिच्या बदला आम्ही लेखण्यांची कचाकची करीत असतो. 

पूर्वी आम्ही विरोधी घराण्यांची तलवारीनें राख रांगोळी करीत होतो. 
आतां लेखण्या चालवून स्वकीय विरोधकांना हयातींतून उठविण्याची मर्दुमकी गाजवीत असतो. 
जुन्या मुत्सद्यांचे सारे (अव)गुण आजही आमच्या कलमबहाद्दरांच्या रोमारोमांत सळसळत आहेत. 
किंचित का मतभेद होईना, पेटलीच एकदम कट्टर शत्रुत्वाची होळी. 
वैयक्तिक आणि जातीय वर्चस्वबाजीची खाज पूर्वजांइतकीच आज खवखवलेली. 
फक्त दाखवायचे दात बुद्धिवादाच्या बेगडीनें मढवलेले, 
खायचे दात थेट पूर्वजांचे! 
दीडदोनशे वर्षे मराठशाही गाजली, पण एकदांहि मराठी माणूस एकवटला नाही. 
एकमेकांच्या तंगड्या ओढीतच आंग्रेजांचा गुलाम झाला. 
आपापसांतल्या लढायांची वर दिलेली यादी आणखीही लांबवता येईल. 
फक्त वानगीदाखल थोडीशी दिलेली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा ज्यांचा अभ्यास चांगला असेल, 
त्यांना त्यांतील पात्रांच्या स्वभावधर्माची ओळख नव्यानें करून देणें नको. 
एकमेकांच्या उरावर बसण्यांतच त्यांच्या तलवार-बहाद्दरीचा नि मर्दुमकीचा सोहळा साजरा होत असे. त्याची फलश्रुति म्हणजे तब्बल दीडशे वर्षांची आंग्रेजांची गुलामगिरी भोगूनही, 
आमच्या पिण्डप्रकृतींत आजही काही बदल होऊं नये, 
आजही अनेक सखाराम बापू, राघोबा दादा, नाना फडणीस, सर्जेराव घाडगे आणि दौलतराव शिंदे 
चालून व मन्वंतरांत त्याच जुन्या वर्चस्वबाजीचे आणि जातीय मत्सराचे धिंगाणे घालीत समाजांत वावरावे, 
हा देखावा महाराष्ट्राच्या भयंकर भाकिताचा सूचक आहे.
अखिल मर्‍हाठी भगिनी बांधवांची अभेदाची एकजूट बांधण्याचा आणि स्वावलंबनाच्या बळावर 

‘‘एकमेकां साह्य करूं, अवघे धरूं सुपंथ’’ या संतोक्तीप्रमाणें, 
नवजीवनाचा मार्ग दाखवण्याचा आजवर कोणी यत्नच केला नाही. 
जो उठला तो राजकारणाची सताड लांबरूंद लाल, भगवी, निळी आणि काळी कफनी पांघरून, 
विश्‍वात्मैक्य भावाचीच भजनें गात बसला. मर्‍हाठा म्हणून एक लोकसमूह आहे, 
त्याच्या काही व्यथा आहेत, काही भावना आहेत, काही आशा आकांक्षा आहेत, 
याचा राष्ट्रव्यापी राजकारणाच्या उफललेल्या बाजारांत काही भावच उरला नाही. 
त्यांची दाद घेतलीच पाहिजे, म्हणून जोरदार पुकारा करीत 
शिवसेनेनें एकजुटीचा कर्णा फुंकतांच, 
‘‘स घोषो घार्तराष्ट्रणाम् हृदयानि विदारत’’ असा प्रकार व्हावा; 
लगेच तिला विरोध करायला मर्‍हाठ्यांच्याच अवलादीचे शकुनी, दुर्योधन, दु:शासन आपापली कुळामुळाची ‘जात’ सांगत अस्तन्या सरसावून गल्लीबोळांच्या नाक्यानाक्यावर येऊन भुकूं लागावे, 
ही मराठी इतिहासाची पुनरावृत्ती विचारवंतांच्या विचारांना दिंङ्मूढ करण्यासारखीच म्हणावी लागेल. 
ज्या सामाजिक, जातीय, धार्मिक आणि महाराष्ट्रीय दुर्गुणांनी मर्‍हाठी माणूस, मयत आंग्रेजी राजवट काय किंवा हयात कांग्रेजी (तथाकथित) लोकवट काय, 
यांत जिवंत असूनही मेल्यासारखा जगत आहे, त्या दुर्गुणांचा निचरा पाडून, 
त्याला नवयुगांतला एक नवा कर्तबगार माणूस बनविण्याच्या हिंमतीने क्षितिजावर आलेल्या 
शिवसेनेचा द्रोह म्हणजे महाराष्ट्राचा द्रोह होय, 
हें विरोधकांनीं ध्यानांत ठेवावे. आपापसांत लढून पूर्वी आम्ही रसातळाला गेलो, 
स्वराज्याला मुकलो, परक्यांचे गुलाम झालो आणि आजही - तथाकथित स्वराज्य आले असले 
तरीही - त्याच अवस्थेंत हतबुद्ध जगत आहोत, ही अवस्था नष्ट करण्यासाठीं सरसावलेल्या शिवसेनेला विरोधकांनीं खुशाल विरोध करावा. परस्थ परक्यांनीं केला, तर तो त्यांच्या पिण्डाला शोभण्यासारखा तरी म्हणता येईल. पण आमच्याच हाडारक्तामांसाच्या लोकांनीं केल्यास, त्यांना मात्र एवढेच सांगावेसे वाटते की बाप हो, दात दाखवा, पण जात दाखवूं नका.

3 comments:

  1. हिन्दू धर्माने कधीच कोणाचा द्वेष केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मुस्लीम-द्वेषाचे लावले जाणारे आरोप चुकीचे आहेत असे खुद्द डॉ.झाकीर हुसेन (माजी राष्ट्रपती) यांनी म्हटले आहे. ज्यांच्या नावाखाली कॉंग्रेस व जातपात पाळणारी राष्ट्रवादी मराठी माणसात तेढ पसरवते, ते महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि रा.स्व. संघाची शिस्त आणि एकी पाहून आम्ही खूप प्रभावित झालो. जनसंघाचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण म्हणतात, कि जातीभेद नष्ट करण्याचे आणि गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम फक्त संघ करू शकतो. आज संघाचे ईशान्य भारतातील कार्य किती जणांना माहिती आहे? हजारो स्वयंसेवक तिथे मुलांना शिक्षण देण्याचे काम करतात आणि हे करत असताना कॉंग्रेसवाले मात्र बांगलादेशींना आसाम मध्ये घुसवून वर संघाची तुलना सिमीशी करतात. आदर्श घोटाळा, महागाई, 2G स्पेक्ट्रम घोटाळा अशा प्रश्नांपेक्षा ज्यांना संभाजी बी ग्रेड ची थेरं जवळची वाटतात त्यांच्या कडून अपेक्षा तरी काय? अशा नामर्द लोकांना भुलू नका, देशाला बुडण्यापासून वाचवा. आंबेडकरांचे लेखन ज्यांनी वाचले पण नाही, असे लोक जेव्हा आंबेडकरांना बदनाम करतात तेव्हा खूप त्रास होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यासाठी तलवार हाती घेतली, तोच काल हे लोक परत आणत आहेत. यांना दादोजी कोंडदेव खुपतात, पण अफझलखानाचा उरूस मात्र हे लोक आनंदानी साजरा करतात. केवळ मतांसाठी राज्य विकणार्यांना कोण माफ करणार देव जाणो! शेवटी एकच गोष्ट सांगतो, हिंदू असल्याची लाज वाटून घेऊ नका. शिवरायांचा सुद्धा धर्म हिंदुत्वच होता.
    गर्व से कहो हम हिंदू है! शान से कहो हम हिंदू है!

    ReplyDelete
  2. ज्या सामाजिक, जातीय, धार्मिक आणि महाराष्ट्रीय दुर्गुणांनी मर्‍हाठी माणूस, मयत आंग्रेजी राजवट काय किंवा हयात कांग्रेजी (तथाकथित) लोकवट काय, यांत जिवंत असूनही मेल्यासारखा जगत आहे, प्रबोधनकार ठाकरे यांनी २४ मार्च १९६८च्या साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये व्यक्त केलेले हे विचार...
    शिवसेनेला विरोधकांनीं खुशाल विरोध करावा. परस्थ परक्यांनीं केला, तर तो त्यांच्या पिण्डाला शोभण्यासारखा तरी म्हणता येईल. पण आमच्याच हाडारक्तामांसाच्या लोकांनीं केल्यास, त्यांना मात्र एवढेच सांगावेसे वाटते की बाप हो, दात दाखवा, पण जात दाखवूं नका.

    ReplyDelete