Thursday, July 26, 2018

मी 'योनी' बोलतेय...!

मी 'योनी' बोलतेय...! (लेखिका : नम्रता भिंगार्डे - रिपोर्टर महाराष्ट्र 1 )

हो , मी योनी बोलतेय . स्त्री योनी . जिच्यापासून तुमच्या आयुष्यातले सगळे वाईट क्षण सुरू होतात. योनीचा शोध लागल्यानंतरच्या दिवसापासून ती परिपक्व होण्यापर्यंत सतत मी अत्याचार सहन करत असते. मासिक पाळी, ऑनर किलिंग, बलात्कार अशा प्रत्येक घटनांमधून तुम्ही माझा आवाज दाबलात. पण आज मी रक्त ओकून बोलणार आहे. दचकलात !

हो , मी योनी बोलतेय . स्त्री योनी . जिच्यापासून तुमच्या आयुष्यातले सगळे वाईट क्षण सुरू होतात. योनीचा शोध लागल्यानंतरच्या दिवसापासून ती परिपक्व होण्यापर्यंत सतत मी अत्याचार सहन करत असते. मासिक पाळी, ऑनर किलिंग, बलात्कार अशा प्रत्येक घटनांमधून तुम्ही माझा आवाज दाबलात. पण आज मी रक्त ओकून बोलणार आहे. प्रत्येक टप्प्यावर स्त्री योनि उद्ध्वस्त करणाऱ्या किडक्या समाजात मी वावरतेय. कितीही अंग चोरलं तरी ही घाण लागायची राहत नाही. आपण स्त्री आहोत म्हणजे नेमकं काय आहोत हे न कळलेल्या वयात कोणीतरी थोराड पुरूष मला स्पर्श करू पाहतो. त्या राकट बोटांच्या स्पर्शाने कसंनुसं होऊन घाबरीघुबरी होते. जोरात ओरडावं वाटत असतं पण आवाज फुटत नाही. घातलेला फ्रॉक चुरगळलेला होता. पायात जीव आणून धावत सुटले पण त्या टप्प्यावर सुरू झालेल्या भोगापासून इच्छा असतानाही दूर पळून जाऊ शकले नाही. हॉस्पिटलमध्ये डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याकडे टक लावून बघत असताना मन भुतकाळातून झरझर वर्तमानकाळात आलंय. हॉस्पिटलमधल्या भिंतींइतकाचं फिकेपणा आणि रितेपणा माझ्यात उरलाय. योनित उठणारी ठणक, शरीर, मन , आत्म्याला खिळे ठोकत चाललीये. कुजबूज कानावर येतेय. "सामुहिक बलात्कार झालाय".... “काल आणलं तेव्हा बेशुद्ध होती”.... “टाके घालावे लागलेत” ... “कुठे कुठे चावलंय बिचारीला कल्पनाच करवत नाही .” आक्रोश कोंडून राहिलाय उरात, धाय मोकलून रडले तरीही कमी होत नाहीये. शुद्ध हरपत चाललीये ... मला जगायचंय ... सन्मानानं , कोणत्याही जखमा न होता... मला....

आता समाजाला शुद्धीवर यावं लागेल. वय वर्षे ४ ते ७० अशा कोणत्याही वयातल्या योनीवर बलात्कार होतो याला जबाबदार कोण? पुन्हा स्त्री? की समाज म्हणून तुम्ही? एखादं दिल्लीचं निर्भया बलात्कार प्रकरण समोर आलं की बलात्कारात योनी उद्ध्वस्त होते म्हणजे नेमकं काय होतं याची तीव्रता जाणवते. पुरूष जात किती क्रूर असू शकते याचे मापदंड म्हणजे आजवर झालेल्या सामुहिक बलात्कारात त्या योनिच्या झालेल्या चिंधड्या. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणात बलात्कार करणाऱ्यांनी लोखंडी सळई तिच्या योनित घुसवल्याचं समोर आलं. तेव्हा या क्रौर्याचा निषेध करत दिल्लीकर जनता रस्त्यावर उतरली होती. आणि माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात काय होतं? बलात्कार झालेली मुलगी दलित आहे की सवर्ण, बलात्कार करणारे दलित आहेत की सवर्ण याच वादात आमचे नेते, पत्रकार, कार्यकर्ते, एनजीओज रुतलेले आहेत. नगर जिल्ह्यातल्या कोपर्डीतली ताजी घटना आपल्याला बरंच काही सांगून जाते. एका अल्पवयीन योनीवर सामुहीक बलात्कार होतो तेव्हा तीला झालेल्या वेदना, तिचं उद्ध्वस्तपण, तिच्या गुन्हागारांना शिक्षा यापेक्षा जास्त ती कोणत्या जातीची होती यावर माध्यमं आणि राजकारणी यांचं लक्ष केंद्रित करतात. कोपर्डीतल्या त्या ९ वीतल्या मुलीवर ४ नराधमांनी फक्त बलात्कारच केला नाही तर तिचे हातपाय तोडले, तिची मान मुरगाळली, तिची योनी उद्ध्वस्त केली. तिच्या शरीरावर अनन्वित अत्याचार करून मगच ते शांत झाले. ९ वीतली कोवळी मुलगी असं काय वावगं वागली की पुरूषार्थ गाजवणाऱ्यांनी तिला इतकं क्रूरपणे मारून टाकलं?

जिला लहानपणी लाडानं नटवलं, जिच्या गोऱ्या मनगटांमध्ये जत्रेत बांगड्या भरल्या, बाहुलीचा हात मोडला तरी जी रडायची त्या लाडक्या लेकीला असं मोडतोड केलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर माय जिवंतीपणी मेली असेल. प्रसिद्धी माध्यमांनी अत्यंत उत्साहाने तिला 'निर्भया' नाव दिलं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी कोपर्डी बलात्काराच्या विषयाने पावसाळी अधिवेशन गाजवलं. मुख्यमंत्री तिच्या घरी भेट द्यायला गेले नाहीत म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीने जोर धरला. या घटनेला प्रसिद्धी माध्यमांनी जेव्हा महत्त्व दिलं, सगळे नेते सारखे बोंडक्यांसमोर प्रतिक्रीया देण्यासाठी धडपड करत होते. इतकंच काय संभाजी ब्रिगेडही मैदानात उतरलं होतं. कोपर्डीमध्ये बळी गेलेल्या मुलीला 'जिजाऊची लेक' वगैरे संबोधल्यानंतर जाता जाता 'ती मुलगी दलित समाजाची की मराठा समाजाची' यावर प्रतिक्रीयेची पिंक टाकून ब्रिगेडने पत्रकार परिषद आवरती घेतली. इथे ' स्त्री ' ही जात पुरेशी नसते. घटनेचं गांभीर्य बलात्कारावरून थेट जातींवर येतं आणि मग तो समाज  'बोलता' होतो, क्वचित कृतीशीलही. बस फोडल्या, जाळल्या जातात. जिल्हाधिकारी कार्यालयांवर, पोलीस स्टेशनवर मोर्चे येतात. वातावरणात तणाव साचून राहतो. बलात्कार ही घटना आता जातीय दृष्टीकोनातून संवेदनशील झाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात येते. या सगळ्या धामधुमीत प्रत्यक्ष बलात्काराचा बळी ठरलेल्याकडे मात्र दुर्लक्ष होतं.

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात घडणारा प्रत्येक बलात्कार हा समाज म्हणून आपण कोणत्या पायरीवर आहोत याचा विचार करायला लावणारा आहे. 'स्त्री' ने तिला आखून दिलेल्या अदृष्य रेषेच्या आतच रहावं. शिक्षण मिळत असलं तरी स्वतंत्र विचार करण्याचा तिला हक्क नाही. ' ब्र ' काढण्याचा तर नाहीच नाही. हेच जणू काही समाज हुंडा, बलात्कार, छळ, मारझोड, संशयी वृत्ती यांच्या माध्यमातून स्त्रियांना सांगत असतो. दलितांपेक्षा दलित असलेल्या स्त्रियांवर होणारे अत्याचारही आता जातीच्या कोंदणातूनच जास्त पाहिले जात आहेत. आपल्या समाजात काट्यासारख्या रुतलेल्या जाती काढण्यासाठी महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्य पणाला लावलं. या महात्म्यांच्या विचारांची झेप इतकी काळाच्या पुढे होती की समाजाला आजही त्यांचे विचार पचलेले नाहीत. ग्रामीण महाराष्ट्रात पोसली जाणारी पुरूषप्रधान संस्कृती आणि शहरांत टोकाला गेलेला तथाकथित स्त्रीवादी दृष्टीकोण यांच्यामध्ये खरोखरीची स्त्री मुक्ती कुठेतरी हरवलीये.

No comments:

Post a Comment