Sunday, May 27, 2018

सावरकर-द्वेष" संपवलाच पाहिजे

||श्री नथुरामाय नमः ||
स्वा.सावरकरांची आज १३३वी जयंती. दरवर्षी सावरकर जयंतीच्या दिवशी जेंव्हा संसदेत सावरकरांच्या भव्य तैलचित्राला हार घालून आपले प्रतिनिधी समस्त देशाच्यावतीने आदर व्यक्त करतात,तेंव्हा मरणानंतरही या मृत्युंजयाचा तिरस्कार करणारे काँग्रेस, कम्युनिस्ट आणि समाजवादी नेते कायमच या कार्यक्रमावर बहिष्कार घालतात  आणि अनभिज्ञ जनता या प्रकाराकडे उदासीनतेने पाहते ! या वर्षीही हेच होणार आहे.
खरे तर, आपल्या ८३ वर्षांच्या आयुष्यातील २८ वर्षांचा काळ एकतर तुरुंगवास किंवा स्थानबद्धतेत काढणाऱ्या या स्वातंत्र्यवीराचे लक्षणीय योगदान माहीत असते तर आजचा भारत, विशेषतः जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेला वा पोहचण्यासाठी धडाडीने तयार असलेला तरुण वर्ग त्यांना डोक्यावर घेऊन नाचला असता ! दुर्दैव हे की, एकतर या असामान्य माणसाच्या कर्तृत्वावर विस्मरण आणि द्वेषाची इतकी पुटे साचली आहेत की अनेकजणांना सावरकरांचे नेमके कार्य काय हेही माहित नाही आणि ज्यांना जी काही थोडीफार माहिती आहे,त्यात समजापेक्षा 'गैरसमजच' अधिक आहेत !
 जसा जसा मी सावरकर वाचत गेलो, दहा हजार पानांचे त्यांचे साहित्य प्रथम सहज म्हणून आणि नंतर भारावून जाऊन वाचत गेलो तसा तसा या व्यक्तीच्या द्रष्ट्या आणि बुद्धीवादी विचारांनी थक्क होत गेलो. या माणसाचा एव्हढा तिरस्कार का ? हा प्रश्न मला नेहमीच अस्वस्थ करतो.
-----------------------------------------------------------------------------------
गांधी-नेहरूंचा "सावरकर द्वेष" केव्हढा टोकाचा होता याचे एकाच उदाहरण.
-----------------------------------------------------------------------------------
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्या पूर्ण हयातीत पंडित नेहरूंनी या क्रांतीकारकाला "स्वातंत्र्य सैनिक" म्हणून कोणतेही पेन्शन वा मानधन मिळणार नाही याची खबरदारी घेतली. अनेक देशमान्य नेत्यांनी याबद्दल केलेली विनंती त्यांनी कायम फेटाळून लावली. अखेर त्यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान झालेल्या शास्त्रीजींनी केवळ महिनाभरात ही पेन्शन मंजूर केली. गांधी आणि नेहरूंच्या ‘हिंदू-मुस्लिम प्रश्नाच्या’ आकलनाबद्दल देशभर रान उठवणाऱ्या सावरकरांविषयीची "सहिष्णुता" नेहरूंनी पेन्शन नाकारून सिद्ध केली. हाच द्वेष परंपरेने पुढे चालवणारी आजची कॉंग्रेस, सावरकरांच्या प्रतिमेपुढे कृतज्ञतेची चार फुले वाहायला नकार देणार यात आश्चर्य ते काय ?
*************
वयाच्या पंचविशीतले सावरकर लंडनमध्ये क्रांतीचा प्रसार करण्यात गुंतलेले, थोरल्या बाबारावांना सरकारने पकडलेले, घरावर जप्ती, सगळी मालमत्ता सरकारच्या ताब्यात, या कुटुंबाशी संबंध ठेवणाऱ्या सर्वांवर ब्रिटीशांची पाळत … अशा परिस्थितीत या कुटुंबातील लहान भाऊ देखील याच कार्यात पडतो आणि त्यालाही पकडले जाते.
 देशासाठी सर्वस्व उधळून देणाऱ्या या माणसाला सरकारने स्वातंत्र्यानंतरही तिरस्कार करून अपमानित केले. गांधी-हत्त्येच्या आरोपातून निर्दोषपणे सुटलेल्या सावरकरांना १९५० साली पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत आली खान भारतात येणार म्हणून पुन्हा पकडले आणि तुरुंगात डांबले. पण महाराष्ट्राने मात्र याच कुटुंबाला त्यागाची "परिसीमा "मानले! याच जनतेने निधी गोळा करून मुंबईत "सावरकर सदन" उभे केले. पुणे आणि नागपूर विद्यापीठांनी त्यांना "डी.लिट." ची पदवी दिली. मुंबई महानगरपालिकेने एकसष्टी निमित्ताने त्यांचा भव्य सत्कार केला. अंदमानच्या कैदेत ५० वर्षे राहावे लागले असते तर सावरकर १९६० साली सुटले असते. त्याच वर्षी पुण्यात "मृत्युंजय दिनाचा" नागरी कार्यक्रम झाला. आज राज्याबाहेर 'सावरकर' हे नांव खरोखरच फार माहित नाही पण महाराष्ट्रात आजही त्याग, क्रांती, अंदमान आणि सावरकर हे समानार्थी शब्दच मानले जातात !!
--------------------------------------------------------------------------------------
स्वा. सावरकरांचा द्वेष तीन कारणासाठी:
---------------------------------------------------------------------------------------
अंदमानातून १९२३ साली सुटून आल्यावर सावरकर लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर होते. समर्पण आणि धैर्याचे एक वलय साहजिकच त्यांच्याभोवती निर्माण झाले होते. रत्नागिरीत निमुटपणे राहून, कॉंग्रेसच्या मतांची भलामण केली असती तर गांधीजींच्या गळ्यातले तेही ताईत झाले असते! पण वास्तवाचे भान असलेल्या या नेत्याने तीन गोष्टी नेमकेपणाने हेरल्या....

१. हिंदू समाजातील अस्पृश्यतेचा प्रश्न हाच देशाच्या अवनतीचे कारण आहे. या जाती-पातीच्या गाळातून या समाजाला बाहेर यावेच लागेल. त्या साठी अस्पृश्यतेविरोधात केवळ विचार नाही तर तातडीची कृती केली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नांना मनापासून साथ दिली पाहिजे. 

२. या देशातील मुस्लिम मानस हे धर्माचा प्रचंड पगडा असणारे आहे. जवळपास ३९% लोकसंख्या असलेल्या मुस्लिम समाजाचा विचार करताना म्हणूनच प्रथम इस्लामचा अभ्यास केला पाहिजे. शक,हूण,कुशाण,ग्रीक,अरब, गझनी, घोरी, लोधी, खिलजी,मोगल या टोळ्या आणि घराण्यांच्या आक्रमणाचा अभ्यास केला पाहिजे. मुस्लिमांमधील सुधारणावादी नेत्यांना पुढे आणले पाहिजे. १९२१ च्या खिलाफत चळवळीने नेमके याच्या विरुद्ध साध्य केले आणि "देशाबाहेरच्या" प्रश्नासाठी मुस्लिमांना प्रथमच चिथावले गेले. कॉंग्रेसच्या विचारांची ही दिशा देशाला फाळणीकडे  नेणारी असल्याने, मुस्लिम धर्मांधतेला आणि त्यांच्या लांगुलचालनाला प्रतिकार करण्यासाठी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे.

३. स्वतंत्र भारत सक्षम व्हायचा असेल तर येथील समाज सुधारणावादी आणि विज्ञान-निष्ठ असला पाहिजे. दर डोई एक मत, सर्वांसाठी एक कायदा, कोणत्याही धर्माचा शासनात हस्तक्षेप होऊ न देणारी राज्य घटना... या दिशेने समाजाला नेले पाहीजे
------------------------------------------------------------------------------------------
या तीनही मुद्द्यांवर गांधी प्रणीत कॉंग्रेसचे विचार पूर्णपणे भिन्न होते -
-------------------------------------------------------------------------------------------
१. अस्पृश्यांना "हरिजन" म्हणणाऱ्या गांधीजीनी या प्रथेविरोधात कोणताही धडक कार्यक्रम हाती घेतला नाही. नाशिकच्या "काळाराम मंदिर" सत्याग्रहाला विरोध करणारे, दलितांना प्रवेशबंदी करणारे गृहस्थ अनेक वर्षे कॉंग्रेसचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष होते. अस्पृश्यते विरोधात ही वरवरची मलमपट्टी सावरकरांना आणि बाबासाहेबानाही मान्य नव्हती.

२. १९२१ ते १९४७ या २६ वर्षांत कॉंग्रेसने कधीही मुस्लिम प्रश्नाबाबत वास्तव आणि समतोल भूमिका घेतली नाही. हास्यास्पद पातळीवर जाऊन मुस्लिमांचा अनुयय केला. एव्हढे करूनही फाळणी व्हायची ती झालीच ! (काही वर्षांपूर्वी मनमोहनसिंग यांच्यासारखे जाणते नेतेही म्हणत होते की, ‘या देशाच्या साधन-संपत्तीवर पहिला हक्क आहे तो मुस्लिमांचा"--हा आहे गांधी नेहरू विचारसरणीचा वारसा!!)

३. हिंदूंच्या न्याय्य हक्कासाठी त्यांचे संघटन करणारे सावरकर मूलतः अधार्मिक आणि पक्के विज्ञान-निष्ठ होते. वेद, पुराणे यांची जागा बंद कपाटात आहे. आज काम आहे ते यंत्रांचे, यावर त्यांचा आढळ विश्वास होता. या उलट “हिंदू संघटन" या शब्दाचे वावडे असणारे आणि ‘हिंदू’ नावाच्या एका समूहालाही काही ‘राजकीय हक्क’ आहेत हेच मान्य नसणारे गांधीजी व्यवहारात मात्र कमालीचे धार्मिक आणि प्रसंगी अंधश्रद्धा जोपासणारे होते ! "अस्पृश्यता पाळता म्हणून बिहारमध्ये भूकंप होतो" अशी त्यांची विधाने असायची. साहजिकच धर्मनिरपेक्षता म्हणजे काय या बाबत काँग्रेसमध्ये कायमच गोंधळ होता.
*************
अंदमानातून सुटल्यावर सावरकरांनी स्वतःची लोकप्रियता पणाला लाऊन, बुद्धीला पटलेल्या या तीन मुद्द्यांचा हिरीरीने प्रचार आणि प्रसार केला, जो कॉंग्रेसच्या विचारधारेच्या पूर्णतः विरोधात होता. सावरकरांनी योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या कारणांसाठी गांधीजी,नेहरू आणि काँग्रेस यांचा गौरव देखील केलेला आहे. पण त्या बदल्यात त्यांच्या वाट्यास मात्र आला तो आजन्म द्वेष आणि मरणोपरांत तिरस्कार !!
-------------------------------------------------------------------------------------------
दोन गैरसमज... "हेतुपूर्वक "पसरवलेले !
--------------------------------------------------------------------------------------------
१. गांधीजींच्या हत्त्येत सावरकरांचा सहभाग होता - वास्तविक लाल किल्ल्यात वर्षभर चाललेल्या विशेष न्यायालयात सावरकारांसकट १२ जणांवर आरोपपत्र दाखल झाले, अनेक पुरावे तपासले गेले, १४९ साक्षीदारांच्या तपासण्या आणि उलट तपासण्या झाल्या, सावरकर सदनातून १०,००० पत्रे जप्त करण्यात आली आणि अखेर न्यायाधीश आत्मा चरण यांनी सावरकरांची निर्दोष मुक्तता केली. हे सत्य पचवू न शकलेल्या कॉंग्रेसने १९६५ साली या कटाचा पुन्हा एकदा "आपल्याला हवा तसा" शोध घेण्यासाठी "कपूर कमिशन" नेमले आणि या कमिशनने ८२ वर्षांच्या या वृद्ध नेत्याशी एकदाही न बोलता, त्यांच्या मृत्युनंतर मात्र "त्यांचा या कटात हात होता" असे आपल्या अहवालात लिहिले. सावरकरांविषयी गैरसमजाचे रान उठवणारे शमसुल इस्लाम,मणिशंकर अय्यर या सारखे ढोंगी विद्वान याच कपूर कमिशनचा आधार घेऊन बोलतात. या कमिशनने कार्यकक्षेबाहेर जाऊन, आरोपीच्या मृत्युनंतर त्याची बाजू ऐकून न घेता केलेली ही बेकायदेशीर चौकशी हीच मुळात सावरकरांचे चरित्र्यहनन करणारी आहे, त्यामुळे या अहवालातील हा उल्लेख रद्दबातल करावा अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली पाहिजे हा शेषराव मोरे यांचा आग्रह म्हणूनच रास्त आहे.

२. सावरकरानी अंदमानातून सुटण्यासाठी ब्रिटीश सरकारला माफीनामा लिहून दिला - हा जावई शोध आहे तो  काही कम्युनिस्ट इतिहासकारांचा. इंग्रजांशी मैदानावर लढताना गोळ्या खाऊन हौतात्म्य पत्करणे अथवा फाशीवर जाणे वेगळे आणि बारी नांवाच्या उद्दाम जेलरच्या हातून छळ सहन करीत वर्षानुवर्षे  तुरुंगात खितपत राहणे वेगळे याचे सम्यक ज्ञान सावरकरांना आणि त्यांच्या अनुयायांनाही होते. सावरकरांनी  जेलमध्ये त्यांच्यावर होणारा अन्याय सहन न करता कायमच त्या विरुध्द आवाज उठवला. राजबंद्यांना संघटीत आणि कैद्यांना सुशिक्षित केले. तुरुंगातही संप आणि हरताळ घडवले. या जीवघेण्या कारावासात त्यांनी एकूण सात वेळा सरकारला निवेदने दिली. ही माहिती प्रत्यक्ष सावरकरांनीच "माझी जन्मठेप" या पुस्तकात अत्यंत सविस्तरपणे दिलेली आहे. त्यामुळे मराठी माणसाला हा आरोप हास्यास्पद वाटतो पण हाच आरोप अमराठी माणसाला संभ्रमित करतो. एक धोरण म्हणून, आपल्या कामाचा मार्ग बदलून, तो आता सामाजिक किंवा विधायक दिशेकडे वळवावा असे जर सावरकरांना वाटले असेल तर तेही न्याय्य आणि रास्तच म्हंटले पाहिजे. भावनिक होऊन अंदमान मध्ये तडफडत मरायचे की देशभरात नव-विचारांची क्रांती घडवायची हा प्रश्न त्यांनाही पडला असू शकतो आणि त्यांचे प्रामाणिक उत्तर आपण मान्य करायला हवे. तुरुंगातून नियमांचा आधार घेऊन बाहेर आलेले आणि उर्वरीत आयुष्य समाज प्रबोधनासाठी वेचणारे सावरकर देशद्रोही आणि फाळणीच्या संदर्भात आपली पूर्वीची धोरणे बदलून विभाजनाला मान्यता देणारे गांधी आणि नेहरू ही मंडळी मात्र देशभक्त.. हा कोणता न्याय ? शेवटी, कोणत्याही नेत्याचे, कोणतेही धोरण हे त्या-त्या काळाच्या आणि परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तपासले पाहिजे ही अक्कल, शमसुल इस्माल, मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या हेतू पुरस्सर तिरस्कार पसरवणाऱ्या विद्वानांना असावी अशी अपेक्षा करणेच चूक आहे !
******************
याकुबाच्या समर्थकांची भलामण करतांना, "आमचे गांधी आणि तुमचे सावरकर” अशी भाषा संसदेत करणारे राहुल गांधी, ही हा द्वेष पुढे नेणारी चवथी पिढी तर सावरकारंवर गरळ ओकणारी,जे.एन.यु. मधील कन्हैया कुमारची पाचवी पिढी ! 

सावरकर ही व्यक्ती आणि विचार जर इतका भयंकर असता तर इतिहासात कधीच पुसून गेला असता. आज नेमके याच्या उलट घडते आहे. एकच उदाहरण पुरे. सत्तर वर्षांपूर्वी या द्रष्ट्या नेत्याने आसाम मध्ये पूर्व-बंगाल मधून घुसखोरी होण्याची शक्यता आहे याची जाहीर चेतावणी तेंव्हाचे मुख्यमंत्री श्री.गोपीनाथ बारडोली यांना दिलेली होती. या प्रदेशात मुळचे हिंदू रहिवासी अल्पसंख्य होतील अशी त्यांना भीती होती. आज नेमके हेच घडले आहे आणि आसामची अस्मिता वाचवायला आणि घुसखोरी थांबवायला आज तेथील जनता  सरकारला भाग पाडते आहे.

या देशातील "सहिष्णुतेची "मक्तेदारी घेतलेल्या विद्वानांनी आणि राजकीय पक्षांनी गेली शंभर वर्षे पोसलेली ही "असहिष्णुता" संपवणे हे सावरकरांना मानणाऱ्या पिढीपुढचे मोठे आव्हान आहे. सावरकर साहित्य आज इतक्या वर्षांनंतरही मराठी वाचाकांपुरते सीमित राहिलेले आहे. त्यांच्या साहित्याचे इंग्रजी भाषांतर होऊन त्याचा व्यापक प्रसार झाला तरच तिरस्कार पसरवणारे नामोहरम होतील. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल......जयंत कुलकर्णी.               फेसबुक वरून साभार

No comments:

Post a Comment